अमळनेर नगराध्यक्षपद उच्चशिक्षित अलका पवारांच्या निमित्ताने सक्षम नेतृत्वाला संधी ?
अमळनेर (प्रतिनिधी) : प्रस्थापित राजकीय समीकरणांना थेट आव्हान देत, शहरातील भोंगळ कारभाराला छेद देण्याच्या निर्धाराने, एक उच्चशिक्षित, निर्भीड आणि तळागाळातील नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीमती अलका उत्कर्ष पवार यांनी आगामी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अमळनेर नगरपरिषद नगराध्यक्षपद हे 'अनुसूचित जमाती' प्रवर्गासाठी राखीव असल्याने, याच प्रवर्गातून येणाऱ्या श्रीमती अलका पवार यांची दावेदारी राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या निर्णायक ठरू शकते. त्यांच्या या आक्रमक तसेच प्रत्येक समाज हिताच्या भूमिकेमुळे अमळनेरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये एका नव्या आणि सक्षम पर्यायाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
"आता केवळ आश्वासनं नको, कृती हवी!" - अलका पवारांचा एल्गार
श्रीमती अलका पवार यांनी आपल्या भूमिकेतून स्पष्ट केले आहे की, त्यांची उमेदवारी केवळ एक राजकीय इच्छा नसून, शहराच्या विकासाचा ध्यास आहे. "मी स्वतः तळागाळातून आले आहे, त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांचा त्रास काय असतो, दूषित पाण्याचे परिणाम काय होतात आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे आरोग्य कसे धोक्यात येते, याची मला पूर्ण जाणीव आहे. एक महिला म्हणून घर चालवताना जसा प्रत्येक पैशाचा हिशोब आणि प्रत्येक गोष्टीचे नियोजन लागते, तसाच पारदर्शक आणि शिस्तबद्ध कारभार शहराला देण्यासाठी मी कटिबद्ध आहे," अशा शब्दात त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला.
त्या पुढे म्हणाल्या, "आजपर्यंत अनेक जण आले आणि गेले, पण अमळनेरच्या मूळ समस्या तशाच आहेत. आता केवळ आश्वासनांवर अवलंबून राहण्याची वेळ संपली आहे. शहराला एका अशा नेतृत्वाची गरज आहे, जे केवळ बोलणार नाही, तर करून दाखवेल. एक शिक्षिका आणि संचालिका म्हणून आर्थिक नियोजन आणि शिस्त माझ्या रक्तातच आहे, आणि याच अनुभवाच्या जोरावर मी शहराचा आर्थिक गाडा सक्षमपणे चालवू शकते, याचा मला पूर्ण विश्वास आहे."
नगराध्यक्षपदाचे आरक्षण 'अनुसूचित जमाती' प्रवर्गासाठी असल्याने, अलका पवार यांच्यासारख्या उच्चशिक्षित आणि तळागाळातून आलेल्या व्यक्तीला उमेदवारी मिळाल्यास, त्यांच्या विजयाची शक्यता वाढते. त्यांच्या समर्थकांमध्ये 'आरक्षणामुळे निर्माण झालेली ही संधी वाया जाऊ नये, तसेच एका सक्षम, सुजाण आणि राखीव प्रवर्गातील नेतृत्वाच्या हाती शहराची धुरा द्यावी,' अशी भावना वाढू लागली आहे.
माजी मंत्री तथा आमदार अनिल दादा पाटील यांच्या आशीर्वादाने विकासाचा नवा अध्याय लिहिणार..
मा. आमदार अनिल दादा पाटील आणि सौ. जयश्री ताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक आणि राजकीय आघाड्यांवर काम करण्याचा दांडगा अनुभव आपल्या पाठीशी असल्याचे अलका पवार यांनी ठामपणे सांगितले. "दादा आणि ताईंचा आशीर्वाद माझ्यासोबत असेल, तर अमळनेरच्या विकासात संधीचे सोने करून दाखवेन. त्यांचे मार्गदर्शन ही माझी ताकद आहे आणि या ताकदीच्या जोरावर मी शहराच्या प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाला पात्र ठरेन. पक्ष जो निर्णय घेईल, तो माझ्यासाठी अंतिम असेल, पण माझी लढाई ही अमळनेरच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले.
सुशिक्षित नेतृत्वावर जनतेचा विश्वास
अलका पवार यांच्या या आक्रमक आणि स्पष्ट भूमिकेमुळे अमळनेर शहरातील सुज्ञ नागरिक, तरुण वर्ग आणि विशेषतः महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आरक्षित जागेवर एक सुशिक्षित महिला उमेदवार असल्याने, "शिकलेली आई घरादाराला पुढे नेई" ही म्हण आता शहरासाठी प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ आली आहे, असे अनेक जण बोलू लागले आहेत. महिला सुरक्षा, रोजगार निर्मिती, नगरपालिका कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि गोरगरिबांच्या हक्कांसाठी एक नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करण्याची क्षमता त्यांच्या शिक्षण आणि अनुभवामुळे त्यांच्यात आहे, यावर लोकांचा विश्वास दृढ होत आहे.
त्यांचा "सेवा परमो धर्म" हा केवळ नारा नसून, एक वचन आहे. "संविधानिक पद हे मिरवण्यासाठी नाही, तर लोकांची सेवा करण्यासाठी असते आणि या पदाची गरिमा जपण्यासाठी मी कुठेही कमी पडणार नाही," या त्यांच्या शब्दांनी नागरिकांच्या मनात विश्वासाचे नवे बीज पेरले आहे. आता अमळनेरची जनता या निर्भीड, सुशिक्षित आणि कर्तबगार नेतृत्वाच्या हाती शहराची धुरा देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
खान्देश समाचार...
