सराईत आरोपी चोरीच्या मोटारसायकलसह जेरबंद; धुळ्यातील गुन्हेगारावर यापूर्वीही बुलेट चोरीचा गुन्हा
अमळनेर: (प्रतिनिधी)
अमळनेर न्यायालय परिसरातून 'मास्टर की'च्या साहाय्याने चोरीला गेलेली एच एफ डीलक्स मोटारसायकल अवघ्या चार तासांत अमळनेर पोलिसांनी हस्तगत केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी धुळे येथील एका सराईत आरोपीला जेरबंद केले आहे. या आरोपीवर यापूर्वी देखील धरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत बुलेट चोरीचा गुन्हा दाखल आहे.
काय आहे प्रकरण?
दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी जयपाल इंदरसिंग राजपूत हे अमळनेर न्यायालयाच्या परिसरात पार्किंगमध्ये लावलेली त्यांची मोटारसायकल (क्रमांक MH 19 DP 4541) घेऊन घरी जाण्यासाठी आले असता, ती चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने अमळनेर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.
चार तासांत आरोपी जेरबंद
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांना मार्गदर्शन करून गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, पोलीस कॉन्स्टेबल विनोद संनदनशिव, उदय बोरसे यांचे पथक तात्काळ तपासासाठी नेमले. या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे केवळ चार तासांच्या आत चोरीच्या मोटारसायकलसह आरोपी धनंजय रवींद्र पाटील (रा. विद्यानगरी, देवपूर, धुळे) याला पकडले.
न्यायालयात तारखेसाठी आला, अन् चोरी केली
चोरी करणारा आरोपी धनंजय पाटील हा त्याच्या कौटुंबिक हिंसाचाराच्या केसमध्ये तारखेवर अंमळनेर न्यायालयात आला होता. न्यायालयाचे कामकाज आटोपल्यावर धुळ्याला घरी जाण्यासाठी त्याने सोबत असलेल्या 'मास्टर की'च्या मदतीने मोटारसायकलचे लॉक उघडून चोरी केली व मोटारसायकल घेऊन पसार झाला होता.
सराईत गुन्हेगार
यापूर्वी देखील याच आरोपीने धरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतून बुलेट मोटारसायकलची चोरी केली होती. तेथील पोलिसांनी त्याला अटक करून बुलेट मोटारसायकल हस्तगत केली होती.
अमळनेर पोलीस विभागाने नागरिकांना आवाहन
दिवाळी सणाच्या काळात नागरिकांनी रोख रक्कम व मौल्यवान दागिने घरात ठेवू नये. तसेच, नागरिकांनी सतर्क व सजग राहण्याची आवश्यकता आहे. आपल्या घरी आणि कॉलनीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, जेणेकरून परिसर सुरक्षित ठेवता येईल, असे आवाहन माननीय पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी केले आहे.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनात यशस्वीरित्या पार पडली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार हे करीत आहेत.
खान्देश समाचार..
मुख्य संपादक प्रवीण बैसाणे
