अमळनेर(प्रतिनिधी जावेद मणियार)अमळनेर येथील खा. शि मंडळ संचालित प्रताप महाविद्यालयातर्फे ट्रेकिंग टीम ची सातपुडा पर्वत रांगेत भ्रमंती नुकतीच पार पडली. प्राचार्य ए. बी जैन यांच्या मार्गदर्शनाने ट्रेकिंगचे आयोजन करण्यात आले होते.सदर समिती प्रमुख डॉ जे. बी. पटवर्धन, वसतिगृह प्रमुख डॉ. अमित पाटील, इतिहास विभाग प्रमुख डॉ. धनंजय चौधरी, प्रा. संदीप नेरकर, प्रा. आकाश चौधरी प्रा. उन्मेष जाधव इ. समिती सदस्य तसेच महाविद्यालयातील विविध विभागातील 33 विद्यार्थी - विद्यार्थिनी या उपक्रमात सामील झाले होते.
सातपुडा मालापूर परिसरातील मार्गदर्शक आणि माजी प्रतापियन्स पिंटू पावरा, ऍड. वसंत पावरा, विरवाडे येथील आबा भिल यांनी सातपुडा पर्वत परिसरात वाट दाखविणे व इतर मार्गदर्शन करून मोलाचे सहकार्य केले. अमळनेर येथून प्रवास करून चोपडा, आडगाव, विरवाडे, मालापूर मार्गे सातपुडा परिसरात गूळ मध्यम प्रकल्प धरण परिसरावर भेट दिली. सुरवातीलाच सुंदर परिसर व धरणाचे विहंगम दृश्य पाहून सर्वाना खूप आनंद झाला व ट्रेकिंग साठी प्रेरणा मिळाली. तेथून ट्रेकिंग ला सुरुवात करून मालापूर ते कर्जाने जवळपास असणाऱ्या विविध सातपुडा पर्वत रांगातील विविध प्रकारची वृक्षवल्ली, पक्षी, फुलपाखरे, प्राणी, विविध फुले, नद्या, झरे, दऱ्या, यांचे निरीक्षण करून सर्वांनी निसर्ग व जंगल भ्रमंतीचा आनंद लुटला. वाटेत गूळ नदी तसेच उपनद्या, नाले यांचे चे मानोरम्य दर्शन झाले. अगदी मध्यभागी सातपुडा परिसरातील वनवासी लोकांशी मार्गदर्शनामुळे योग्य संवाद साधता आला. वनवासी भगिनी मालापूरच्या अंगणवाडी सेविका इंदुताई लेद्या पावरा आणी लेद्या बारकू पावरा यांनी सातपुडा पर्वत मध्ये असलेल्या त्यांच्या सुंदर लाकडी झोपडीत बसण्याची, चहापाणीची व वनभोजन करण्याची व्यवस्था केली. यांच्या सुंदर शेतीत असलेले व खूपच मोठ्या मनाने सर्वाना दिलेले गावरानी काकडी, मका, शेंगा इ. मनसोक्त खायला मिळाल्याने सर्वांचा आनंद खूपच द्विगुणित झाला. विलोभनीय निसर्गारम्य अश्या झोपडीच्या परिसरात सर्वांनी वनभोजन केले.
विद्यार्थ्यांनी गूळनदीच्या प्रवाहात साखळी करून एकतेचे संदेश दिले. खडकावर बसून समूह फोटो ग्राफी केली. भारत माता की जय, वंदेमातरम, छत्रपती शिवाजी महाराज, पूज्य सखाराम महाराज. इ अनेक थोर पुरुषांचे गौरव उदगार, घोषणानी सातपुडा पर्वत रांगा व परिसर दुमदुमून गेला होता. परतीच्या प्रवास करून संध्याकाळी अमळनेर येथे मंगळग्रह मंदिराचे दर्शन घेऊन ट्रेकिंग कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली होती.
खान्देश समाचार,अमळनेर

