डिजिटल बँकिंगच्या युगात सायबर भामट्यांनी आता फसवणुकीचा नवा आणि अत्यंत धोकादायक मार्ग शोधला आहे. अमळनेर नगरपरिषदेत कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या बँक खात्यातून कोणताही OTP (वन टाईम पासवर्ड) किंवा बँकेचा फोन न येता केवळ काही मिनिटांत तब्बल ९४,९९९ रुपये ९७ पैसे दोन टप्प्यांत लंपास करण्यात आले. या धक्कादायक प्रकारामुळे अमळनेर शहरासह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून डिजिटल व्यवहारांच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
नेमकी घटना काय?
अमळनेर येथील ताडेपुरा भागातील रहिवासी आणि अमळनेर नगरपरिषदेचे कर्मचारी योगेश पवार (वय ३२) यांचे IDBI बँकेत खाते आहे. ५ जून २०२६ रोजी सकाळी ठीक ११:३८ वाजेच्या सुमारास सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या खात्यावर डल्ला मारला.
सायबर चोरांनी अत्यंत हुशारीने दोन टप्प्यांत हे पैसे काढले:
पहिला व्यवहार: ₹५०,०००/-
दुसरा व्यवहार: ₹४४,९९९.९७/-
एकूण रक्कम: ₹९४,९९९.९७/-
पैसे कपात झाल्याचे मॅसेज मोबाईलवर धडकल्यानंतर पवार यांना मोठा धक्का बसला. धक्कादायक बाब म्हणजे, या दोन्ही मोठ्या व्यवहारांसाठी पवार यांच्या मोबाईलवर कोणताही ओटीपी आला नाही, की बँकेकडून कोणत्याही पडताळणीसाठी कॉल आला नाही.
तात्काळ ऑनलाईन तक्रार दाखल
फसवणूक झाल्याचे समजताच योगेश पवार यांनी वेळ न घालवता आपले मित्र गौतम बिऱ्हाडे, सतीश बिऱ्हाडे आणि अनंत संदानशिव यांच्याशी संपर्क साधला. याप्रसंगी अनंत संदानशिव यांनी अत्यंत सतर्कता दाखवली. त्यांनी तात्काळ सायबर गुन्ह्यांच्या राष्ट्रीय पोर्टलवर (www.cybercrime.gov.in) जाऊन ऑनलाईन तक्रार नोंदवली. यामध्ये व्यवहाराची अचूक वेळ, रक्कम आणि बँकेचा तपशील तातडीने अपलोड करण्यात आला. यामुळे सायबर पोलिसांना पुढील तपासासाठी आणि पैसे 'फ्रीझ' करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
या घटनेची गांभीर्याने दखल घेत अमळनेर पोलिसांमार्फत तातडीने तपासाची चक्रे फिरवली आहेत. पोलिसांनी संबंधित IDBI बँकेला या संशयास्पद व्यवहारांची सखोल तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. कोणताही ओटीपी न येता एवढी मोठी रक्कम बँक खात्यातून वळती झाल्याने बँकेच्या सुरक्षा प्रणालीत गंभीर त्रुटी असल्याचे संभावना समोर येत आहे.
सायबर तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या काळात सायबर गुन्हेगार जुन्या पद्धती सोडून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. ओटीपी न येता होणाऱ्या फसवणुकीमागे खालील कारणे असू शकतात:
१. सिम क्लोनिंग : यामध्ये सायबर गुन्हेगार तुमच्या नकळत तुमच्याच नंबरचे दुसरे सिम कार्डActive करतात. त्यामुळे सर्व ओटीपी आणि मेसेज त्यांच्या फोनवर जातात आणि मूळ ग्राहकाला काहीच समजत नाही.
२. मोबाईल हॅकिंग किंवा मालवेअर : मोबाईलमध्ये एखादे अनधिकृत किंवा संशयास्पद ॲप डाऊनलोड झाल्यास, चोरांना मोबाईलचा पूर्ण ॲक्सेस मिळतो. ते तुमच्या स्क्रीनवरील ओटीपी तुमच्या नकळत वाचू शकतात आणि मेसेज डिलीटही करू शकतात.
३. प्री-अप्रूव्ड ट्रान्झॅक्शन : काही आंतरराष्ट्रीय किंवा विशिष्ट पेमेंट गेटवेवर ओटीपीची आवश्यकता नसते. तिथे केवळ कार्डचा तपशील आणि सीव्हीव्ही (CVV) नंबर टाकून व्यवहार पूर्ण केले जातात.
अशी फसवणूक टाळण्यासाठी आणि फसवणूक झाल्यास काय करावे, यासाठी नागरिकांनी खालील गोष्टींची नोंद घ्यावी:
गोल्डन अवर लक्षात ठेवा: फसवणूक झाल्यापासूनचे पहिले १ ते २ तास अत्यंत महत्त्वाचे असतात. या काळात तक्रार झाल्यास पैसे परत मिळण्याची शक्यता ८०% असते.
तात्काळ संपर्क करा: सायबर फसवणूक झाल्यास ताबडतोब १९३० या राष्ट्रीय हेल्पलाईन नंबरवर कॉल करा किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.
इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन बंद ठेवा: तुमच्या बँकिंग ॲपमध्ये जाऊन 'इंटरनॅशनल पेमेंट्स' आणि 'नो-ओटीपी' आधारित व्यवहार नेहमी बंद ठेवा.
अनोळखी लिंक्स टाळा: लॉटरी, स्वस्त लोन किंवा विजेचे बिल भरण्याच्या नावाखाली येणाऱ्या कोणत्याही अज्ञात लिंक्सवर क्लिक करू नका.
खान्देश समाचार...
जनहितार्थ.....
