अमळनेर(प्रतिनिधी )धुळे रस्त्यावरील मंगरूळनजीक आज (दि. ९) सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. एस.टी. बस, कार आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण तिहेरी अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हॉटेल वृंदावनजवळ सकाळी ७ वाजेच्या सुमारास हा थरार घडला. मृतांमध्ये गुजरातहून अमळनेरकडे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या एकाच कुटुंबातील ५ सदस्यांचा समावेश असल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एस.टी. बस (क्र. MH 13 CU 7540) आणि मोटरसायकल (क्र. MH 18 C 8719) हे अमळनेरकडून धुळ्याच्या दिशेने जात होते. याच वेळी समोरून (धुळ्याकडून) येणाऱ्या कारने (क्र. GJ 19 AF 3147) एस.टी. आणि मोटरसायकलला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, मोटरसायकलचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आणि धरणगाव येथील रहिवासी असलेले मोटरसायकलस्वार जागीच ठार झाले.
साखरपुड्याचा आनंद दुःखात बदलला!
अपघातातील कारमधील मृत प्रवासी हे मूळचे व्यारा (गुजरात) येथील रहिवासी होते. ते अमळनेर येथे एका साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी आनंदाने निघाले होते, मात्र वाटेतच काळाने त्यांच्यावर झडप घातली.
अपघातातील मृत व्यक्तींची नावे:
आदित्य चंद्रकांत महाजन (व्यारा, गुजरात)
अनिता सुरेश महाजन (व्यारा, गुजरात)
निर्मला नंदलाल महाजन (व्यारा, गुजरात)
नंदलाल गोपाल महाजन (व्यारा, गुजरात)
सुरेश विक्रम महाजन (व्यारा, गुजरात)
मोटरसायकलस्वार (राहणार - धरणगाव)
चिमुरड्याचा जीव वाचला, बचावकार्याला वेग
घटनास्थळावरील थरार: अपघातानंतर कारचा पूर्णतः चक्काचूर झाला होता. यात एक लहान मुलगा गाडीत अडकून पडला होता. अपघात घडताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि एस.टी. कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत शर्थीचे प्रयत्न करून त्या चिमुरड्याला सुखरूप बाहेर काढले. एस.टी.मधील दीपक दिलीप पाटील नावाचे प्रवासी देखील या घटनेत जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच 'डायल ११२' च्या माध्यमातून पोलीस यंत्रणा सतर्क झाली. अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे, रवी पाटील आणि पोलीस पाटील भागवत पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना '१०८' रुग्णवाहिकेने तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून, मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.
खान्देश समाचार..
