अमळनेर - भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट २०२५ रोजी मांडळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 'सावलीची पेरणी' या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. लोणखुर्द गावाचे सरपंच डॉ. शशिकांत पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला.
यावेळी डॉ. पाटील यांनी 'सावलीची पेरणी' या चळवळीपासून प्रेरणा घेऊन मांडळ प्राथमिक आरोग्य केंद्राला तब्बल १११ झाडे भेट दिली. वृक्षारोपणाच्या गरजेवर बोलताना डॉ. पाटील यांनी, भारताचा शाश्वत आर्थिक विकास साधण्यासाठी वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धनही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
यानंतर डॉ. पाटील यांनी आरोग्य केंद्रातील सोयीसुविधांची माहिती घेतली आणि कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांशी संवाद साधला. त्यांच्या या उपक्रमाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक्षा पाटील यांनी कौतुक केले. ही झाडांची भेट पर्यावरणपूरक असून सामाजिक बांधिलकी जपणारी असल्याचे त्यांनी सांगितले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. साक्षी बोरसे यांनी या उपक्रमामुळे परिसरातील इतर सरपंचांनाही प्रेरणा मिळेल आणि 'सावलीची पेरणी' चळवळीला अधिक गती मिळेल, असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला मांडळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक्षा पाटील, डॉ. साक्षी बोरसे, आरोग्य सहायक एस. एच. थोरात, बी. जी. सपकाळ, आरोग्य सहाय्यिका श्रीमती जोशी, कनिष्ठ सहाय्यक भारती कोळी, निरीक्षक एम. आर. शेख आणि आरोग्य सेवक अक्षय बागडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार आरोग्य सहायक बी. जी. सपकाळ यांनी मानले.