अमळनेर (प्रतिनिधी):
शहरातील गलवाडे रस्त्यावरील नामांकित 'पोदार' शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळेच्या इमारतीचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नसताना आणि परिसरात लोखंडी सळ्या, सेंट्रिंगचे साहित्य विखुरलेले असतानाच शाळा सुरू करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. व्यवस्थापनाच्या या भूमिकेमुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, लहान मुलांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेच्या परिसरात सध्या वेगाने बांधकाम सुरू आहे. ज्या ठिकाणी लहान मुले वावरत आहेत, तिथेच उघड्या लोखंडी सळ्या, अवजड सेंट्रिंग प्लेट्स आणि बांधकामाचे इतर साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आहे. उंचावरून एखादी लोखंडी प्लेट किंवा साहित्य निसटल्यास चिमुरड्यांच्या जिवावर बेतू शकते. जमिनीवर पडलेले खिळे आणि काचांमुळे विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत होण्याचा धोकाही निर्माण झाला आहे.
नियमानुसार, कोणत्याही शैक्षणिक संस्थेला इमारत पूर्ण झाल्याचा दाखला आणि स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट मिळाल्याशिवाय शाळा सुरू करता येत नाही. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी 'अग्निशमन विभागाचा' दाखला असणेही बंधनकारक आहे. मात्र, या शाळेकडे आवश्यक परवाने आहेत का? आणि बांधकाम सुरू असताना शाळा भरवण्यास परवानगी कोणी दिली? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
शैक्षणिक सत्र सुरू करण्याच्या घाईत मुलांच्या जिवाला मुकण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. तरी पूर्णसुरक्षा नियमांचे पालन करूनच शाळा सुरू करावी, अशी जनसामान्य भावना व्यक्त होत आहे.
खान्देश समाचार...
