अमळनेर | प्रविण बैसाणे
आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प आणि घटनात्मक हक्कांच्या रक्षणासाठी कटिबद्ध असलेल्या 'आदिवासी क्रांती दल' या संघटनेने अमळनेर तालुक्यात आपला प्रभाव अधिक गडद केला आहे. संघटनेच्या वतीने गांधली आणि देवगाव देवळी या ग्रामीण भागात आयोजित विशेष फलक अनावरण व मार्गदर्शन सोहळ्यांमधून आदिवासी बांधवांना आपल्या हक्कांची जाणीव करून देण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. बाबासाहेब बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की, "आदिवासी समाज आजही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहे. त्यांना शासनदरबारी असणाऱ्या योजनांची माहिती पोहोचवणे आणि त्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढा उभारणे, हेच आमच्या संघटनेचे सर्वोच्च ध्येय आहे." याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उमाताई भिल, पत्रकार प्रवीण बैसाणे आणि माजी मुख्याध्यापक एस. बी. बैसाणे यांनी समाजाला विविध क्षेत्रांत संधी शोधून स्वावलंबी होण्याचे आवाहन केले.
गांधली येथील फलक अनावरण सोहळ्यात शाखाध्यक्ष सतीश पारधी यांनी पुढाकार घेतला, तर देवगाव देवळी येथील कार्यक्रमाचे नियोजन शाखाध्यक्ष सुरेशभाऊ भिल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या दोन्ही ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये आदिवासी समाज बांधवांनी प्रचंड गर्दी करत संघटनेच्या कार्यावर आपला विश्वास दर्शवला. गांधली येथे सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या प्रेरणादायी सोहळ्यास मा. मुकेशभाऊ नेतकर, मा. रमेशभाऊ पवार, स्वामीभाऊ कोळी, अमळनेर तालुकाध्यक्ष आप्पासाहेब दाभाडे, मा. संतोषभाऊ संदानशिव, दयाराम मोरे, विनोद मोरे, प्रकाशभाऊ सोनवणे, सुदाम वाघ,कविता पवार आणि बबलू पवार,कल्याणी दाभाडे,कविता मोरे,गणपत दाभाडे,यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी तालुकाध्यक्ष आप्पासाहेब दाभाडे आणि सर्व शाखाध्यक्षांनी विशेष परिश्रम घेतले. आगामी काळात अशाच प्रकारे संपूर्ण तालुक्यात संघटनात्मक दौरे आखून आदिवासी समाजाला संघटित करण्याचा निर्धार संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
खान्देश समाचार..
