अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यातील 'भारतीय बौद्ध महासभेतर्फे दि.28 रोजी आयोजित केलेल्या 'वर्षावासाच्या प्रवचन मालिका सांस्कृतिक बुद्ध विहार, फरशी रोड येथे ''बौद्ध धम्माची खास वैशिष्ट्ये" या विषयावर प्रा.डॉ.हर्षवर्धन जाधव यांचे व्याख्यान झाले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक बुद्ध वंदना व त्रिशरण पंचशील म्हणण्यात आले. याप्रसंगी प्रा.डॉ. हर्षवर्धन जाधव यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य,समता,बंधुता व न्याय या तत्त्वावर आधारित मौलिक अशी राज्यघटना आपल्या देशाला दिली. भगवान गौतम बुद्धांनी आपल्या 'कर्म सिद्धांतात' सांगितले आहे की, कुशल कर्म हा बौद्ध धम्माचा गाभा आहे. अनेक लोक जिवंतपणी आपल्या आई-वडिलांची सेवा करत नाही. मात्र ते गेल्यावर, त्यांचे श्राद्ध पिंडदान तेरावी, चौदावी करतात. समाजाला आई-वडिलां विषयी खोटे प्रेम दाखवितात. अशा अनिष्ट प्रथेला बौद्ध धम्मात थारा नाही. बौद्ध धम्म हा सत्य, मैत्री, करुणा, प्रेम, विज्ञान व वास्तवतेवर आधारित आहे. बुद्ध म्हणतात की, मी सांगतो ती गोष्ट तोपर्यंत प्रमाण मानू नका. जोपर्यंत तुमच्या कसोटीला ती गोष्ट सत्य ठरत नाही. बुद्धांनी आपल्या धम्मात 'मनुष्य' हा केंद्रबिंदू मानला आहे. माणसाने माणसाला माणुसकीने वागणे, हाच खरा धर्म किंवा सत्कर्म आहे. देव-देवता, स्वर्ग-नरक, दैव-नशीब,आत्मा-परमात्मा, कर्मकांड, व्यक्ती पूजा, मोक्ष, पुनर्जन्म, यज्ञ, इत्यादी गोष्टींना बुद्धांनी स्पष्टपणे नाकारले आहे. एकीकडे पूजाअर्चा करायची व दुसरीकडे माणुसकी शून्य वागायचे हे सत्करमाला न शोभणारे आहे. माणसाचे सत्कर्म हे त्याच्या कृतीतून दिसले पाहिजे. शेवटी त्यांनी सांगितले की "बौद्ध धम्म" हा भौतिक सुखापेक्षा मानसिक सुख-शांती देणारा आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूराव संदानशिव यांनी तर प्रास्ताविक डी.आर. सैंदाणे यांनी केले. या कार्यक्रमासाठी ज्योती बिऱ्हाडे, प्रा.डॉ.विजय तुटे,प्रा डॉ बी बी भालेराव, ज्ञानेश्वर निकम,प्रा.भानुदास गुलाले प्रा.डॉ.सी एम नेतकर, प्रा.डॉ. राहुल निकम, प्रा. राजेंद्र गायकवाड,एड. शिवकुमार ससाणे, अनिल बनसोडे,धीरज ब्रह्मे,संदीप भैय्या सैंदाणे,ए.एन घोलप, हरिभाऊ वाघ,अनिल गायकवाड, श्रीकांत खैरनार,मिलिंद निकम,अर्जुन संदानशिव,दयाराम मोरे. इत्यादी समाज बांधव उपस्थित होती.
खान्देश समाचार....✒️
प्रविण बैसाणे
9145442324
