अमळनेर (प्रतिनिधी ) : अमळनेर तालुक्यातील अवैध वाळू माफियांमुळे खून प्रकरण ताजे असतांनाच तालुक्यातील बोरी नदीच्या पात्रात अवैधरित्या वाळूचा बेसुमार उपसा करुन छोट्या टेम्पो गाड्याद्वारे बिनबोभाट वाहतूक केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सविस्तर वृत्त असे की, अमळनेर तालुक्यातील हिंगोणे प्र अ, फापोरे बु गावालगत असलेल्या बोरी नदीच्या पात्रात शेकडोच्या संख्येने छोट्या टेम्पोच्या साह्याने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरू असून याकडे प्रशासनाने गांधारी ची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
यामुळे वाळू चोरट्यांचे पैशाच्या व मनगटाच्या बळावर पेव फुटले असून वाळू चोरटे जोमात तर प्रशासन कोमात असल्याचे चित्र दिसत आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
हिंगणे प्र अ आणि फापोरे बु गावालागत बोरी नदी पात्रातून वाळू चोरी करुन अमळनेर शहरातील कॉलनी भागात रात्री अपरात्री चोरट्या मार्गाने हैदोस घातला आहे.
तालुक्यातील बोरी नदी पात्रात वाळू माफियांनी पुन्हा बेसुमार वाळू उपसा करुन सर्रास चोरटी अवैध वाळू वाहतूक सुरु केली आहे. या वाळू चोरीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने तलाठी, मंडळ अधिकारी यांचे पथक नियुक्ती केले आहे. परंतु महसुलची ही यंत्रणा कार्यान्वित नसल्यासारखेच चित्र आहे. सदरील वाळू चोरट्यांना महसूल प्रशासनाचा अभय तर नाही ना ? शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याची चर्चा शहरात सुरु आहे.
या अवैध वाळू माफियांवर योग्य कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
खान्देश समाचार

