अमळनेर(प्रतिनिधी) भारत मुक्ती मोर्चा तसेच बहुजन क्रांती मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएम भांडाफोड परिवर्तन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे त्या अनुषंगाने उद्या अमळनेरात सकाळी 9 वा. प्रबुद्ध विहार येथून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
शासक जातींच्या षडयंत्रामुळे लोकशाही व्यवस्था धोक्यात आलेली आहे. संविधानाला अभिप्रेत असणारी जन कल्याणकारी उद्दिष्टे साध्य करण्यापासून या देशातील शासक वर्ग उदासीन दिसत आहे. तेव्हा वर्तमानात लोकशाही व्यवस्थेवर हल्ला करून हुकूमशाहीच्या दिशेने होणारी वाटचाल हिचा केंद्रबिंदू ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन चा गैरवापर आहे. त्यात गडबडी करून व खोट्या जनादेशनुसार संविधानिक यंत्रणांचा गैरवापर करून लोकशाही व्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसते. तेव्हा या षडयंत्राला रोखणे संविधान प्रेमी नागरिकांचे कर्तव्य ठरते.
बहुजन क्रांती मोर्चा व भारत मुक्ती मोर्चा यांच्या माध्यमातून अमळनेर येथे येणारी ईव्हीएम भंडाफोड परिवर्तन यात्रा शुक्रवार दिनांक 03 मार्च 2023 रोजी सकाळी 09 वाजता मा. वामन मेश्राम, राष्ट्रीय अध्यक्ष, भारत मुक्ती मोर्चा यांच्या नेतृत्वाखाली अमळनेर येथे प्रबुद्ध विहार,छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, बळीराजा चौक, महाराणा प्रताप चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, संत गाडगे महाराज चौक, दगडी दरवाजा, पाच कंदील चौक ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून पुढे मार्गस्थ होणार आहे.
तरी सर्वांनी या परिवर्तन यात्रेत अवश्य उपस्थित रहावे व लोकशाही वाचविण्याच्या लढ्यास पाठबळ द्यावे, असे आवाहन अमळनेर येथील आयोजक समिती तसेच सामाजिक संघटनांकडून करण्यात आला आहे.
