अमळनेर(प्रतिनिधी) संत महापुरुषांची भूमी असलेल्या अमळनेर शहरातील गांधलीपुरा रहिवाशी वस्तीतून वेश्यावस्ती व व्यवसाय हद्दपार करा ही संपूर्ण गांधलीपुरा वासीयांची मागणी असल्याचे रियाज मौलाना यांनी पत्रकार परिषदेत सांगितले तसेच प्रशासना दुर्लक्ष करीत असल्याने नाराजी व्यक्त केली.
गांधलीपुरा येथील रियाज मौलाना यांच्या स्टडी सेंटर मध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. प्रा. अशोक पवार,संदीप घोरपडे,बी के सूर्यवंशी,बन्सीलाल भागवत, एस सी तेले यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.रियाज मौलाना म्हणाले की
वैश्या व्यवसाय मधून मलिदा खाणाऱ्या काहीं गुंड प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधीनी प्रशासन व सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याची भावना आंदोलन कर्त्यांची झाली आहे. आम्ही सर्व सामाजिक संघटना संबंधित मुद्दे समाजापर्यंत घेऊन जाऊन जनतेचे प्रबोधन करणार आहोत आणि नंतर आंदोलनाचे टप्पे ठरवणार आहोत असे त्यांनी सांगितले. तसेच आम्ही या बेकायदेशीर कुंटनखान्या विरोधात आवाज उठविला असून न्यायालयातही गेलो आहोत,अनेक अडचनी आम्ही सहन करतोय,मात्र आमचा आवाज दाबला जात आहे, या महिलांचे दुसरीकडे पुनर्वसन केले पाहिजे असे सांगत याचिका कर्ते आंदोलन कर्त्यांना वेश्याव्यवसाय चालकाकडून धोका असल्याने पोलीस संरक्षण द्यावे,पोलीस अधिकाऱ्यांनी या परिसरात गस्त घालून वेश्याव्यवसाय बंद करावा, त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात,अमळनेर नगरपरिषदेने या परिसरात कार्यक्षम सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे.,जिल्हा महिला बालकल्याण अधिका-यांनी वेश्यागृह चालविणाऱ्यांचे समुपदेशन करावे व त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करावी व पर्यायी अन्य व्यवसाय करावयास मार्गदर्शन व मदत करावी,भरवस्तीत वैश्याव्यवसाय सुरू असल्याने, आजूबाजूला राहणाऱ्या लहान मुला मुलींवर त्याचा विपरीत परिणाम होतो. रात्री बेरात्री चांगल्या लोकांचे दरवाजे ठोकले जातात हे प्रकार थांबवावे आदी मागण्या मौलाना यांनी केल्या.
यावेळी प्रा.अशोक पवार यांनीही आपली भूमिका मांडत प्रशासन या प्रकरणात गल्लत करीत असल्याचा आरोप केला आणि या वस्तीचे दुसरीकडे पुनर्वसन करावे अशी मागणी केली.यावेळी कुदरत अली,मनोज मोरे,शेर खा पठाण,नावेद शेख, आबीद अली,सोमचंद संदानशिव यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
खान्देश समाचार..
