सावखेडा (ता. अमळनेर) | प्रतिनिधी
✍️मुख्य संपादक प्रविण बैसाणे,अमळनेर
एका मातेचा मृत्यू हा केवळ एका व्यक्तीचा अंत नसतो, तर अनेक आयुष्यांवर त्याचा परिणाम होतो. सावखेडा या छोट्याशा गावात सध्या अशीच एक वेदनादायक घटना समोर आली आहे, जी गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणि हृदयात अस्वस्थता घेऊन आली आहे.
सुमनबाई अहिरे, वय अंदाजे साठेक वर्षे, गेल्या अनेक वर्षांपासून अठरा विश्व दारिद्र्यात जीवन जगत होत्या. त्यांच्या आयुष्यात कधीच सुखाचं कवडसं आलं नाही. पती गेल्यानंतर दोन अपंग मुलांचं संगोपन हेच त्यांच्या जगण्याचं एकमेव कारण होतं.
एक मोठा मुलगा असून परंतु त्याचाशी ह्या परिवाराचा कुठलाही संपर्क होत नाही,त्यांची मोठी मुलगी पूर्णपणे अपंग असून हालचालही करू शकत नाही, तर मुलगा मतिमंद आहे — त्याला स्वतःची जबाबदारीही समजत नाही. अशा अवस्थेत सुमनबाईंचं कर्तृत्व केवळ आईचं नव्हे, तर एक देवदूत म्हणून समाजाने पाहिलं.
पोटासाठी झगडणं, गावात डब्याने पाणी आणणं, कुणाकडून थोडा किराणा मागणं,गावातील अनेक दयाळू व्यक्ती दर महिन्याला थोडा तांदूळ, डाळ देत असे — अशा मदतीवर त्यांचा संसार चालायचा. कुठलाही सरकारी आधार, योजना किंवा निधी त्यांच्या घरापर्यंत पोहोचला नाही.
परंतु... काळाने शेवटी घात केला.
सुमनबाईंचा आज अचानक मृत्यू झाला. कोणतीही मोठी शारीरिक तक्रार नसताना, कदाचित उपासमारीच्या पाठीमागे झिजलेल्या शरीराने हार मानली. आणि त्या दोन्ही अपंग लेकरांना वाऱ्यावर सोडून गेल्या.
आज त्यांच्या झोपडीतील दृश्य पाहिलं की हृदय हेलावून जातं –
🔹 एका कोपऱ्यात पडलेली अपंग मुलगी, डोळ्यांत भिती आणि उपासमारीची छाया...
🔹 बाजूला बसलेला मतिमंद मुलगा, जो अजूनही समजून घेत नाही की ‘आई आता परत येणार नाही…’
गावकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत, पण मदतीसाठी हतबलता जाणवते.
या दोन लेकरांना अन्न, निवारा, औषध, आणि सर्वात महत्त्वाचं – सुरक्षितता – याची अत्यंत गरज आहे.
"आज या मुलांना आईची नाही, पण समाजाच्या माणुसकीची गरज आहे!"
सावखेडा गाव, संपूर्ण अमळनेर तालुका आणि त्यापलीकडेही जे कोणी दानशूर, संवेदनशील, समाजहितवादी आहेत, त्यांनी कृपया या निष्पाप अपंग मुलांच्या पुनर्वसनासाठी पुढे यावं.
शासनाने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा, जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि सामाजिक संस्थांनी याकडे लक्ष द्यावं, अशी मागणी गावकऱ्यांकडून जोर धरते आहे.
“आई गेली... पण आपण त्यांच्या मुलांसाठी ‘आईसारखे’ का ठरू शकत नाही?”
या घटनेवर केवळ सहवेदना व्यक्त करून थांबू नका... कृतीतून माणुसकी जगा.
खान्देश समाचार विशेष
