मुख्य संपादक - प्रविण बैसाणे
खान्देश समाचार,अमळनेर✍️
अमळनेर: सणासुदीचे दिवस आणि लागोपाठच्या सुट्ट्यांचा फायदा घेत अमळनेर तालुक्यात वाळू माफियांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे चोरटे बिनदिक्कतपणे अवैध वाळू वाहतूक करत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. विशेषतः पांझरा नदीतून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असून, रात्र-दिवस ही वाहतूक सुरू असल्याचे चित्र आहे. भर पावसाळ्यातही वाळू माफिया जोरात वाळू उपसा करत आहेत.
महसूल पथकांवर प्रश्नचिन्ह
वाळू चोरीला आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनाने पथके तयार केली आहेत, मात्र ही पथके नेमकी काय काम करतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेकदा ही पथके जागेवरच नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत. प्रशासनाची ही उदासिनता वाळू चोरांसाठी जणू 'सुवर्णसंधी' ठरत आहे.
महसूल बुडतोय, पर्यावरणाची हानी
या अवैध वाहतुकीमुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. तसेच, नदीपात्रांचे संतुलन बिघडत असून पर्यावरणाची हानी होत आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. केवळ पथके तयार करून उपयोग नाही, तर ती प्रभावीपणे कार्यरत आहेत की नाही, याची तपासणी करणेही आवश्यक आहे.
अवैध वाळू उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाने अधिक कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.