पिळोदे (प्रतिनिधी अमळनेर): नियतीने हिरावून घेतलेल्या घरातील कर्त्या पुरुषाची जागा आणि कुटुंबाचा आधार परत मिळावा यासाठी पिळोदे येथील एका कुटुंबाने अखेर अन्यायाविरुद्ध संघर्षाचा मार्ग पत्करला आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून ग्रामपंचायत प्रशासनाच्या दारात अश्रू ढाळून आणि वारंवार विनंती करूनही दुर्लक्ष झाल्यामुळे, आता हे कुटुंब गावाच्या इतिहासात प्रथमच ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे.
गांधी जयंतीच्या पवित्र दिवशी, २ ऑक्टोबर २०२५ रोजी, निलेश प्रकाश शिरसाट आणि त्यांची आई लोकशाही मार्गाने उपोषणाची सुरुवात करणार आहेत.
नेमका संघर्ष काय?
घरातील कर्ता पुरुष कर्तव्यावर असताना मयत झाल्यानंतर त्यांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर शिपाई पदावर नियुक्ती मिळावी यासाठी हे कुटुंब अनेक वर्षांपासून अर्ज करत आहे. मात्र, या अर्जावर कोणताही विचार केला जात नाहीये, असा त्यांचा गंभीर आरोप आहे. ग्रामपंचायतने त्यांच्या अर्जावर विचार न करता, त्याच जागी दुसऱ्या व्यक्तीला काम दिले आणि तसा ठरावही मंजूर केला.
"मी कामासाठी नकार दिला असता, तर पुन्हा पुन्हा अर्ज का केले असते?" असा काळीज पिळवटून टाकणारा सवाल अर्जदार निलेश शिरसाट यांनी विचारला आहे.
इतकंच नव्हे, तर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव आणि गट विकास अधिकारी, पंचायत समिती अमळनेर यांच्याकडून आलेल्या नोटिसांकडेही ग्रामपंचायतने सरळ दुर्लक्ष केल्याचा आणि गेल्या काही महिन्यांपासून एक अनोळखी व्यक्ती भूतपूर्व शिपाई म्हणून कार्यालयीन कामे करत असल्याचा धक्कादायक दावाही त्यांनी केला आहे.
या सर्व प्रकारच्या दुजाभाव आणि अन्यायमुळे नाइलाजाने आपल्याला उपोषणासारखा कठोर निर्णय घ्यावा लागत आहे, असं सांगताना कुटुंब पूर्णपणे भावनावश झालं आहे.
आज, अर्जदार आणि त्यांच्या आईने ग्रामपंचायत कार्यालयात लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनावर तातडीने आणि योग्य कार्यवाही न झाल्यास, २ ऑक्टोबर २०२५ रोजी हे कुटुंब ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करेल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
या लढ्यात न्याय मिळेल, या आशेने हे कुटुंब आता महात्मा गांधी जयंतीच्या दिवसाची वाट बघत आहे.
खान्देश समाचार...
