अमळनेर (प्रतिनिधी): भारतीय सेनादलातील महार रेजिमेंटमध्ये तब्बल १७ वर्षांची देशसेवा पूर्ण करून अमळनेर शहरात परतलेले वीर जवान विजय किरण संदानशिव आणि संदीप संदानशिव यांचे आज अमळनेरकरांनी अभूतपूर्व आणि ऐतिहासिक स्वागत केले. त्यांचे हे स्वागत केवळ एक सोहळा नसून, त्यांच्या राष्ट्रनिष्ठेचा, शौर्याचा आणि अतुलनीय कर्तृत्वाचा भव्य गौरव होता.
अमळनेर रेल्वे स्टेशनवर या वीर जवानांचे आगमन होताच संपूर्ण परिसर देशभक्तीच्या जयघोषाने दुमदुमला. शेकडो अमळनेरकर नागरिक आणि नातेवाईक यांच्या उत्साही उपस्थितीत, वाजत-गाजत आणि डीजेच्या तालावर देशभक्तीपर गीतांच्या गजरात जवानांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
शहरातील महामानवांना विनम्र अभिवादन
शहरातून निघालेल्या या मिरवणुकीदरम्यान जवानांनी अनेक महत्त्वाच्या स्थळांना भेट देऊन आदर व्यक्त केला. स्टेट बँके जवळील साने गुरुजी यांच्या पुतळ्यास, सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास आणि विशेषतः महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जवानांनी अभिवादन केले आणि कृतज्ञता व्यक्त केली.
ठिकठिकाणी नागरिक आणि संस्थांकडून सत्कार
या मिरवणुकीत फरशी रोडवरील सिद्धार्थ व्यायाम शाळा आणि एबी ग्रुप अमळनेर यांच्यातर्फे जवानांचा जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच, ताडेपुरा येथे पंचशील युवक मंडळाने त्यांचे जंगी स्वागत केले. संपूर्ण मार्गावर जवानांच्या निवासस्थानापर्यंत प्रत्येक ठिकाणी महिलांनी आरती करून त्यांचे औक्षण केले, ज्यामुळे या स्वागताला एक भावनिक आणि पारंपरिक किनार लाभली.
पराक्रमाचा सन्मान आणि शौर्यगाथेचे कौतुक
स्वागताच्या या भव्य समारोप कार्यक्रमात, जवान विजय किरण संदानशिव आणि संदीप संदानशिव यांनी पुलवामा येथील युद्धजन्य काळात केलेली कामगिरी तसेच 'ऑपरेशन सिंदूर' मधील त्यांच्या धाडसी कार्याबद्दल विशेष कौतुक करण्यात आले. त्यांचे राष्ट्रप्रेम आणि समर्पण भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
यावेळी अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पीएसआय बोरकर, मिलिंद सोनार, शिरपूरचे माजी नगरसेवक पिंटू शिरसाट, माजी नगरसेवक नरेंद्र संदानशिव, राजेंद्र संदानशिव, माजी सैनिक विनोद बिऱ्हाडे,विनोद संदानशिव तसेच सुप्रसिद्ध गायक भैया मोरे यांची विशेष उपस्थिती होती. यांसह मोठ्या संख्येने महिला आणि परिसरातील नागरिकांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हजेरी लावली होती.
संपूर्ण अमळनेर शहराने आज आपल्या या 'शौर्याच्या प्रतीकांना' दिलेला हा सन्मान, त्यांच्या १७ वर्षांच्या खडतर सेवेसाठी दिलेली एक कृतज्ञ मानवंदना ठरली.
खान्देश समाचार..
मुख्य संपादक प्रविण बैसाणे
