भवरखेडे-विवरे:(प्रतिनिधी)येथील माध्यमिक विद्यालय भवरखेडे-विवरे येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी भाषणांनी साजरी करण्यात आली. सत्य आणि अहिंसेचे पुजारी असलेल्या या महान नेत्याला विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आदराने अभिवादन केले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनल पाटील मॅडम यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यांनी गांधीजींना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यानंतर, शाळेतील पाचवी ते दहावीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींच्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण प्रसंग, त्यांचे विचार, आणि सत्य, अहिंसा या तत्त्वांवर आधारित त्यांच्या महान चळवळींना उजाळा दिला. या भाषणांमुळे विद्यार्थ्यांना गांधीजींच्या आदर्शांची माहिती मिळाली.
याप्रसंगी वैष्णवी ढिवरे, कुणाल उदय पाटील, सागर नागराज पाटील, दर्शना पाटील, विवेक किशोर पाटील, चंद्रशेखर विठ्ठल पाटील यांसारख्या अनेक विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या विचारांवर आधारित प्रभावी भाषणे दिली.
विद्यालयातील शिक्षक श्री.राजेश ठाकरे आणि श्रीमती सविता पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी गांधीजींचे विचार आजच्या काळातही किती महत्त्वाचे आहेत, यावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिकांसह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. या उत्साही वातावरणात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा व मूल्यांचा वारसा पुढे नेण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळाली.
खान्देश समाचार..
