अमळनेर:(प्रतिनिधी)नगरपरिषद अमळनेर लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी सर्वसाधारण असे पद जाहीर झाल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. आरक्षणाची ही घोषणा होताच, संपूर्ण अमळनेर शहराचे लक्ष एका प्रामाणिक व निस्वार्थी व्यक्तिमत्त्वाकडे वेधले आहे,त्या म्हणजे माजी नगरसेविका सखुबाई भिल
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेल्या सखुबाई भिल, ज्या ताडेपुरा प्रभागातून नगरसेविका होत्या, त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या अभूतपूर्व विकासकामांनी आज त्यांना नगराध्यक्षपदासाठी लोकांच्या पसंतीस उतरवले आहे. त्यांची उमेदवारी ही केवळ राजकीय खेळी नसून, तळागाळातील आणि आदिवासी समाजातील एका कर्तृत्ववान महिलेला सर्वोच्च संधी देण्याची अमळनेरकरांची इच्छा आहे.
विकासकामांची ‘दूरदृष्टी’
माजी नगरसेविका सखुबाई भिल यांच्या कार्याची नोंद घेण्यासारखी आहे. ताडेपुरा भागातील रस्त्यांची अत्यंत दयनीय परिस्थिती असताना, त्यांनी केवळ आश्वासनं न देता, नगरपालिकेकडून विशेष निधी मिळवून रस्त्यांची उत्कृष्ट व्यवस्था केली. पिण्याच्या पाण्याची नळांची व्यवस्था, गल्ली-गल्लीत पद दिवे लावून संपूर्ण भागात केलेली रोषणाई, तसेच महिलांसाठी स्वच्छ शौचालयाची निर्मिती हे त्यांचे महत्त्वाचे निर्णय ठरले. या कामांमधून त्यांची दूरदृष्टी आणि सर्वसामान्य नागरिकांप्रति असलेली बांधिलकी स्पष्टपणे दिसून येते. त्यांनी ताडेपुराचा विकास करताना कोणताही स्वार्थ न ठेवल्याने, एक प्रामाणिक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची प्रतिमा जनमानसात पक्की झाली आहे.
जनतेचा ‘प्रामाणिकपणा’ पाहता भावी नगराध्यक्ष म्हणून पसंती..
अनुसूचित जमातीसाठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होताच, सखुबाई भिल यांना शुभेच्छांचे फोन आणि प्रत्यक्ष भेटी घेण्यासाठी लोकांची रीघ लागली आहे. त्यांच्या निस्वार्थीपणा आणि विकासाच्या कामांमुळे नागरिकांनी त्यांना 'भावी नगराध्यक्ष' म्हणून एकमुखाने पसंती दर्शविली आहे.
एका सर्वसामान्य आदिवासी कुटुंबातील महिला अमळनेरच्या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यास, अमळनेरच्या राजकारणात एक नवा आणि सकारात्मक बदल होईल, असा विश्वास संपूर्ण शहरात व्यक्त होत आहे. सखुबाई भिल यांची उमेदवारी प्रामाणिक आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रतिनिधित्व करणारी ठरू शकते, ज्यामुळे अमळनेरच्या राजकारणाला एक नवी दिशा मिळू शकेल.
खान्देश समाचार...
