भवरखेडे-विवरे:(धरणगाव प्रतिनिधी)येथील माध्यमिक विद्यालय भवरखेडे-विवरे च्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत आपली यशाची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. विद्यार्थ्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
या स्पर्धेत विद्यालयाच्या अनेक विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे. इयत्ता ९ वी चा विद्यार्थी भूषण अनिल पाटील याने ६०० मीटर धावने या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला, तर ४०० मीटर धावनेमध्ये कल्पेश शांताराम पाटील याने प्रथम क्रमांक आणि सागर नागराज पाटील याने द्वितीय क्रमांक मिळवून विद्यालयाची शान वाढवली.
याव्यतिरिक्त, इयत्ता नववी च्याच हितेश कांतीलाल पाटील याने गोळाफेक (३ किलो वजन) या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवत आपले कौशल्य सिद्ध केले. विशेष म्हणजे, या चारही यशस्वी विद्यार्थ्यांची आता जिल्हा पातळीवर होणाऱ्या पुढील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
याशिवाय, साई संदीप पाटील याने २०० मीटर धावणे या प्रकारात तृतीय क्रमांक मिळवत तालुका स्तरावर यश संपादन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या या दणदणीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आदरणीय नानासाहेब डॉ. शांताराम दाजीबा पाटील, उपाध्यक्ष दादासो संकेत पाटील, तसेच प्राचार्य वर्षाजी पाटील मॅडम, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनल पाटील मॅडम आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. या गुणवंत खेळाडूंना पुढील जिल्हास्तरीय वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
खान्देश समाचार..
