अमळनेर:(प्रतिनिधी)आगामी अमळनेर नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत नगराध्यक्ष पदासाठी आता एक युवा आणि लोकप्रिय चेहरा जोरदार चर्चेत आला आहे. वॉर्ड क्रमांक पाच मधील रहिवासी आणि शहराला आपल्या उत्कृष्ट क्रिकेट खेळाने परिचित असलेले जितेंद्र प्रभाकर साळुंखे उर्फ 'जितू मास्टर' यांच्या नावाला अनुसूचित जमाती जनरल राखीव नगराध्यक्ष पदासाठी मोठ्या प्रमाणात युवकांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याने ते आता प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
युवकांच्यात प्रचंड लोकप्रिय असलेले 'जितू मास्टर' हे केवळ खेळाडू नसून एक सक्रिय सामाजिक कार्यकर्ते आणि युवा नेतृत्व म्हणूनही ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली युवकांचा एक विशाल मित्रपरिवार सातत्याने सामाजिक कामांमध्ये गुंतलेला असतो. अमळनेर शहरातील तरुणाईचा विश्वास संपादन केलेले साळुंखे यांना राजकारणात संधी मिळाल्यास शहराला कल्पक आणि गतिमान नेतृत्व मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
युवकांचे नेतृत्व, विकासाची नवी दिशा
राजकारणात तरुण आणि ताज्या दमाच्या नेतृत्वाला संधी मिळायलाच हवी, या भूमिकेचा पुरस्कार करणारे अनेक जण 'जितू मास्टर' यांच्या उमेदवारीचे समर्थन करत आहेत. युवकांची नवनिर्मितीची क्षमता, ऊर्जेचा स्त्रोत आणि आधुनिक विचारसरणी संपूर्ण समाजाच्या विकासाला एक नवी दिशा देऊ शकते.
समाजाच्या अनुसूचित जमाती प्रवर्गातून येत असलेले जितेंद्र साळुंखे यांना नगराध्यक्ष पदावर संधी मिळाल्यास ते समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत विकास पोहोचवू शकतील, अशी अपेक्षा नागरिकांना आहे. खेळाच्या मैदानातून सामाजिक आणि आता राजकीय आखाड्यात उतरू पाहणाऱ्या 'जितू मास्टर' यांच्या उमेदवारीमुळे अमळनेर नगरपालिकेची निवडणूक निश्चितच रोमांचक होणार यात शंका नाही.
आता या युवा नेतृत्वाला नगराध्यक्षपदासाठी संधी मिळते का, आणि हा युवकांचा वाढता उत्साह मतांमध्ये परिवर्तित होऊन 'जितू मास्टर' अमळनेरचे नेतृत्व करतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
खान्देश समाचार..
