अमळनेर (प्रतिनिधी):
बॅटरी आणि पॉवर एनर्जी क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे 'सम्राट बॅटरी'चे मालक आणि युवा उद्योजक कैलास नामदेव खैरनार रा. उदय नगर, (डांगर बु.) यांची थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. पॉवर एनर्जी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी पॉवर हब तर्फे या विशेष दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कैलास खैरनार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून खानदेशातील धुळे, जळगाव आणि नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांत बॅटरी आणि पॉवर एनर्जी क्षेत्रात रिटेल व होलसेल व्यवसायात उल्लेखनीय कार्य केले आहे. विशेषतः ऑटोमॅटिक बॅटरी आणि इन्व्हर्टर बॅटरी क्षेत्रात त्यांनी सखोल तांत्रिक अभ्यास आणि पारदर्शक व्यवसायाच्या जोरावर आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या याच अनुभवाची आणि योगदानाची दखल घेऊन पॉवर हब' कंपनीने त्यांची या अभ्यासात्मक दौऱ्यासाठी निवड केली आहे.
हा अभ्यास दौरा १७ फेब्रुवारी २०२६ ते २१ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत थायलंडमध्ये पार पडणार आहे. या दौऱ्यादरम्यान तेथील बॅटरी निर्मितीचे अद्ययावत तंत्रज्ञान, ऊर्जा संवर्धन आणि पॉवर बॅकअप क्षेत्रातील नवीन संशोधनाचा ते अभ्यास करणार आहेत. या दौऱ्यामुळे खानदेशातील बॅटरी व्यवसायाला नवीन दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमळनेर तालुक्यातील डांगर बुद्रुक (सध्याचे उदयनगर) येथील रहिवासी असलेले कैलास खैरनार यांनी केवळ व्यवसायातच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या यशाबद्दल अमळनेर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातून त्यांचे कौतुक होत आहे.
"स्थानिक पातळीवर काम करताना आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाची जोड मिळाली, तर ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा देता येतात. हा दौरा माझ्यासाठी आणि आमच्या व्यवसायासाठी नवीन शिकण्याची मोठी संधी आहे."
- कैलास खैरनार, युवा उद्योजक
या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
खान्देश समाचार..
