अमळनेर : तालुक्यातील ग्रामीण भागात सर्रास अवैधपणे झाडांची कत्तल सुरू असून याकडे प्रशासनाने सोयीस्कररित्या डोळेझाक केल्याचे दिसून येत आहे. वनविभागाच्या अधिकार्यांचे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याने हा प्रकार घडत असल्याचे बोलल्या जात आहे.
आज नैसर्गिक ऑक्सिजनची मानवाला किती नितांत गरज आहे, हे कोरोना सारख्या महाभयंकर संसर्गाने दाखवून दिले आहे. तरीही मानवाकडून स्वतःच्या फायद्यासाठी वन संपत्तीची लूट करण्यात येत आहे. केंद्र व राज्य सरकार एकीकडे झाडे लावा, झाडे जगवा. हा संदेश देत शेतकर्यांना बांधावर झाडे लावून त्याला जगवण्याचा मोबदला देखील देत आहे. निसर्गाचा समतोल कायम राहावा व नागरिकांना शुद्ध हवा मिळावी या प्रांजळ हेतू सरकार ठेवत असताना दुसरीकडे मात्र, अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात लाकूड तस्कराच्या टोळ्यांकडून मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड सुरू आहे. शेकडो वर्ष वय असलेल्या जुन्या मोठ मोठ्या झाडांची सर्रासपणे कत्तल होत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे या गंभीर बाबीकडे वनविभागानेही दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.तालुक्यातील पाडसे,एकतास आदी ठिकाणी लाकुड तस्करांचा धुडगूस सुरू आहे. निंबाची तसेच इत्यादी
वृक्षांची कत्तली करण्यासाठी वापरण्यात आलेली अवजारे..
प्रकारच्या झाडाची कत्तल सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे निसर्गाचा मोठ्या प्रमाणात र्हास होवून हवामानावर विपरीत परिणाम होत आहे. या लाकुड तस्करांना वनविभाग देखील पाठिशी घालत असून कुठल्याच प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. संबधित परिसरातून तोडलेल्या झाडांच्या लाकडांची विविध वाहनांतून वाहतूक करून ती शहराच्या सॉ मिलवर घेवून जातात?. या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी निसर्ग प्रेमी करत आहेत.
पाडसे- एकतास - शाहपुर परिसरातील झाडे तोडी संदर्भात व्हिडिओ फोटो खान्देश समाचार कडे उपलब्ध...
शासनाच्या उपक्रमाला मूठमाती : ‘झाडे लावा झाडे जगवा’ या शासनाच्या उपक्रमाला वनविभाग व लाकुड तस्कर या दोघांनीही मुठ माती दिल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे. अवैध व विनापरवानगी सर्रास सुरू असलेल्या वन संपदा लूट प्रकरणी वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, तस्कर व वनरक्षक, वनपाल यांच्यावर काय कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.प्रविण बैसाणे...✍️


