अमळनेर (प्रतिनिधी)
महाराष्ट्राच्या मातीचा गंध जपणारी, हृदयाशी भिडणारी आणि संस्कृतीला जपणारी भाषा म्हणजे मराठी. महाराष्ट्रात व्यवसाय, रोजगार, शिक्षणासाठी आलेल्या परप्रांतीयांनी देखील मराठी भाषा आत्मसात केली पाहिजे, ही सक्ती नसून सामाजिक जबाबदारी आहे, असे परखड मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष धनंजय साळुंखे यांनी व्यक्त केले.
मराठी ही फक्त भाषा नाही तर ती आमची मायबोली, आमचा गौरव, आमचा अस्मिता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आजपर्यंत मराठी हीच संवादाची खरी शक्ती राहिली आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठीचा आदर केला पाहिजे, असे साळुंखे यांनी दुकानदारांना आवाहन करताना सांगितले.
“महाराष्ट्रात राहून, इथे पोट भरणारे जर इथल्या माणसांशी हिंदीत संवाद साधत असतील, तर हे दु:खद आहे. ग्राहकांशी मातृभाषेत संवाद होणे आवश्यक आहे. त्यामुळे ‘मराठीत बोला’ हे आमचे मागणे नाही, तर ही आमची भावना आहे,”
— धनंजय साळुंखे, शहराध्यक्ष, मनसे
राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होत तासखेड व लोंढेवेतील असंख्य तरुणांचा मनसेत जाहीर प्रवेश
मराठी अस्मितेसाठी नेहमी आक्रमक भूमिका घेणारे राज ठाकरे हे आजच्या नवतरुणांचे आशास्थान ठरत आहेत. त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन अमळनेर तालुक्यातील तासखेड व लोंढेवे गावांतील अनेक तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. त्यावेळी कल्पेश पाटील, धनराज पाटील, चेतन पाटील, आदेश पाटील यांच्यासह अनेक नवतरुणांचा समावेश होता.
या कार्यक्रमप्रसंगी तालुका अध्यक्ष संदीप पाटील, शहराध्यक्ष धनंजय साळुंखे, आणि शहर सचिव निलेश भावसार हे मान्यवर उपस्थित होते.
मराठीचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि नवतरुणांना संघटित करण्यासाठी मनसेचा हा उपक्रम महाराष्ट्रात नवचैतन्य निर्माण करत आहे.
खान्देश समाचार
मुख्य संपादक प्रवीण बैसाणे..
