अमळनेर (प्रतिनिधी)
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने माजी मंत्री आणि आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात भर पावसात हजारो शेतकऱ्यांनी हजेरी लावून उत्सवाला भव्य रूप दिले. पोळा सणासाठी ३००० बैलजोडी धारक शेतकऱ्यांना खास सजावट साहित्याची किट, तर कष्टकरी मापाडींना स्वतंत्र लॉकर किल्लीचे वाटप करण्यात आले.
शेतकऱ्यांना आधुनिकतेकडे घेऊन जाणारे विधायक पाऊल
या कार्यक्रमात आमदार अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ आणि जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते शेतकऱ्यांना पोळा सणासाठी बैल साज, तर मापाडींना वैयक्तिक लॉकर किल्लीचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार अनिल पाटील म्हणाले, “मतदारसंघ बागायती होत नाही तोवर मी शेतकऱ्यांची साथ सोडणार नाही. पं.स., जि.प., न.प. आमच्या ताब्यात द्या, शेवटच्या घटकापर्यंत सर्व योजना पोहचवून दाखवतो.”
शैक्षणिक साहित्याची भव्य तुला आणि प्रबोधनाचा संदेश
या प्रसंगी आमदार पाटील यांच्या सपत्नीक मिरवणुकीचे आयोजन सजविलेल्या बग्गीतून ढोल-ताशांच्या गजरात करण्यात आले. त्यांना शैक्षणिक साहित्याची तुला करत शिक्षणाच्या महत्त्वावर भर देण्यात आला. बाजार समितीतर्फे गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य शाळांमध्ये जाऊन दिले जाणार असल्याचे सभापती अशोक पाटील यांनी स्पष्ट केले.
राज्यातील पहिली मापाडींसाठी लॉकर सुविधा देणारी बाजार समिती
अमळनेर बाजार समितीत शेकडो मापाडी काम करतात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र लॉकर सुविधा सुरु करून त्याची किल्ली वाटप करण्यात आली – ही राज्यातील पहिली आगळी वेगळी सामाजिक जबाबदारी मानली जात आहे.
एकमताने यशाची दिशा… समिती झाली जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर!
सभापती अशोक पाटील यांनी सांगितले की, बाजार समिती आता कर्जमुक्त असून ५ कोटी रुपयांची शिल्लक आहे. विविध विकासकामांमुळे समिती जिल्ह्यात पहिल्या तर विभागात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. शेतकरी निवास मंजूर झालेला असून लवकरच स्वस्त, चविष्ट भोजनही उपलब्ध होणार आहे.
कार्यक्रमात मान्यवरांची मांदियाळी व मोठा उत्सवाचा जल्लोष
या कार्यक्रमात संचालक डॉ.अनिल शिंदे, डॉ.अशोक पाटील, भोजमल पाटील, समाधान धनगर, सौ.सुषमा पाटील, सौ.पुष्पा पाटील, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष भागवत पाटील आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन रणजित शिंदे यांनी केले तर आभार सुरेश पाटील यांनी मानले.
बाजार समिती परिसर शेतकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेला
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिव डॉ. उमेश राठोड व त्यांच्या संपूर्ण टीमने परिश्रम घेतले. शेतकऱ्यांच्या प्रचंड प्रतिसादामुळे समितीचा परिसर चैतन्यमय झाला होता.
खान्देश समाचार... ✍️
मुख्य संपादक प्रवीण बैसाणे

